मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि विशेष तपास पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवून अंतरिम गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक पटकावणार्या दोन टॉपर उमेदवारांसह दोन मध्यस्थांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या नव्या अटकेमुळे या घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.
एमपीएससीच्या मेरिट लिस्टमध्ये आले तिसरे अन् चौथे
तपासात उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. अटक करण्यात आलेला आरोपी उमेदवार साजिद संदे हा लेखी परीक्षेत १५२.५० गुण मिळवून अंतरिम गुणवत्ता यादीत तिसर्या स्थानी होता. तर दुसरा आरोपी विजय किंगर याने १५६ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला होता. याआधी अटक करण्यात आलेली ऋतुजा पाटील हिने देखील १५५ गुण मिळवून गुणवत्ता यादीत सातवे स्थान पटकावले होते. अव्वल गुण मिळवणारे हेच उमेदवार आता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत.
सांगोला, बुलढाणा अन् नवी मुंबईतून चौघे ताब्यात
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, साजिद संदे याला सांगोला येथून तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणार्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संदीप खलाटे हा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असून भैरवनाथ कदम हा भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
अवर सचिवाने फोडला होता पेपर
चे अवर सचिव अभिजीत लेंडवे याने मध्यस्थांमार्फत हा पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात याआधी अवर सचिव अभिजीत लेंडवे, गोपनीय कक्षात काम करणारा समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील यांच्यासह मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली होती. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
२२ जुलै रोजी जाहीर झालेल्या ४८८ जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना २०० पैकी १२० पर्यंतच मजल मारता आली होती. मात्र, १२० पेक्षा अधिक गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावणारे असेही काही विद्यार्थी होते, ज्यांची अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी अत्यंत सामान्य होती आणि त्यांचा क्रमांक हजारांमध्ये होता. आता अव्वल क्रमांक पटकावलेल्या साजिद संदे आणि विजय किंगर यांना अटक झाल्याने या बातमीवर मोहर उमटली आहे.
नेमके काय आहे औषध निरीक्षक प्रकरण?
तर्फे अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील एकूण १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रातील ६ विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान शासकीय पदाचा गैरवापर करून, गोपनीयतेचा व निष्पक्षतेचा भंग करत आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंच अनधिकृतपणे लीक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल
या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गंभीर गुन्हे () दाखल करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही उमेदवारांचा सहभाग असण्याची शक्यता असून येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.